सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर शरद पवारांची भूमिका काय राहणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेने राज्याच्या सर्वच क्षेत्रांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार होते. अजित पवार यांनी या विलिनीकरणाची घोषणा १२ फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित केले होते. तसे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितले होते. मात्र, अचानक अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वच बाबी अडचणीत आल्या असून अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकनेते म्हणून लोकप्रिय होते. कार्यकर्त्यांना बळ देणारे आणि त्यांच्यासाठी पडेल ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा एकखांबी तंबू होता.
त्यांची लोकप्रियता किती होती, याचा अंदाज त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सर्वांना आला. त्यामुळे त्यांच्यासारखा नेता अचानक गेल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये निर्माण झालेली पोकळी, पुढे काय होणार, काय करायचे, असे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभे राहिले आहेत.
त्यातील एका गोष्टीवर सर्व राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या राजकारणातील वावर पाहता त्यांना अजित पवार सांभाळत होते. अर्थ खाते सांभाळणे त्यांना सध्या तरी शक्य नाही.
त्यामुळे हे पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या तरी आपल्याकडे ठेवतील, विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर अजित पवार यांच्याकडील खाती कोणाकडे द्यायची, हे निश्चित केले जाईल, असे सध्याच्या हालचालींवरून दिसून येत आहे.
अजित पवार हे संपूर्ण राज्यात सर्वांना मान्य असलेले नेते होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणे, दररोज हजारो लोकांना न थकता भेटणे, त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी झटणे, हे त्यांचे कसब होते.
हे त्यांनी एक-दोन दिवस नव्हे, तर वर्षानुवर्षे करून दाखवले होते. त्यामानाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्यासारखा सर्वदूर मान्यता असलेला नेता नाही. जे नेते आहेत, त्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या तालुका, जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. त्यामुळे अजित पवार यांची जागा घेऊ शकेल, असा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तरी दिसून येत नाही.
सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नेमके स्थान काय राहणार? – सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तरी राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण होणार, अजित पवार यांच्याकडे असलेली खाती कोणाकडे दिली जाणार, हे प्रश्न आहेत.
त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची नेमकी भूमिका काय राहणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी आपल्या मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचे सांगितले होते.
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी ठेवली असल्याचे बोलले जात होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याकडेही लक्ष आहे.
रोहित पवार यांना शरद पवार यांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर रोहित पवार हेच पवार घराण्यातील अनुभवी नेते मानले जात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पवार घराण्याची धुरा जाणार का, पक्षातील इतर ज्येष्ठ नेते त्यांना स्वीकारणार का, असे अनेक प्रश्न राज्यासमोर उभे राहणार आहेत.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील, नवाब मलिक यांची भूमिका काय राहणार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढील भवितव्य कसे असेल, हे निश्चित होणार आहे.
अजित पवार यांचे पुत्र जय आणि पार्थ पवार यांना पक्ष किती पुढे करतो, की रोहित पवार यांच्याकडेच धुरा दिली जाईल, हे येणारा काळ ठरवेल. ज्याला पक्ष आणि कार्यकर्त्यांची मान्यता मिळेल, त्याच्यासाठी कसोटीचा काळ असेल. पुढील तीन वर्षे निवडणुका नसल्याने या काळात पक्षबांधणी करून आपले नेतेपद सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
शरद पवार नेमके काय करणार? – दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. भाजपसोबत जाण्यास शरद पवार यांचा पहिल्यापासून विरोध होता. त्यामुळेच त्यांनी निवृत्ती जाहीर करून पक्षाला एक प्रकारे भाजपसोबत जाण्यास तेव्हा हिरवा कंदील दाखवला होता.
मात्र, ही निवृत्ती त्यांनी अचानक जाहीर केल्याने तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते व नेत्यांनी त्याला विरोध केला आणि शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारत भाजपसोबत युती केली. त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे.
भाजपसोबत न जाण्याचे धोरण शरद पवार यांचे आजही कायम आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यानंतर शरद पवार निवृत्ती घेणार होतेच, पण आता परिस्थिती बदलली आहे.
अजित पवार यांच्यासारखा नेता अचानक गेल्याने निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार, हा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर पुढील तीन वर्षे निवडणुका नसल्याने या काळात पडद्यामागे राहून शरद पवार विलिनीकरण झालेल्या पक्षाचे दोर आपल्या हातात ठेवणार की खरोखरच निवृत्ती स्वीकारणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपत आहे. त्यांना पुन्हा राज्यसभेत जायचे असेल, तर त्यांच्या एकट्याच्या जीवावर सध्या तरी ते शक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले तरच ते पुन्हा राज्यसभेत जाऊ शकतात. त्यांनी पुन्हा राज्यसभेत न जाण्याचा निर्णय घेतला, तर ते खरोखर निवृत्ती स्वीकारत असल्याचे समजले जाईल.















