डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू आणि वर्दळीच्या प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील ‘श्री ठाकूरधाम’ बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने महिलेला जिवे मारण्याची धमकी देत बंगल्यातून ५०,०००/- रू.कि.चे चंदनाचे झाड कापुन नेल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेण्याची घटना १० ऑगस्टला पहाटे ४:४५ सुमारास घडली. सोसायटीच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून कोणी येऊ नये म्हणून आरोपींनी दुचाकी रस्त्याला आडव्या लावून ठेवल्या होत्या.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादिनी पोलिसांच्या ११२ नंबरला फोन लावला. सुमारे १५ ते २० मिनिटांनी पोलिस बिट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे झाड घेऊन गेले होते. आवाजामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले; परंतु हत्यारबंद आरोपी पाहिल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला फोन करून बाहेर येऊ नका, असे बजावले होते.
सात ते आठ जणांचे टोळके तक्रारदार यांच्या बंगल्याच्या आवारात घुसून चंदनाचे झाड कापत होते. त्या वेळी झाड कापताना झालेला आवाज ऐकून तक्रारदार आणि त्यांचे पती अॅड. रोहित एरंडे जागे झाले. रोहित यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, सात ते आठ जणांचे टोळके त्यांना दिसले.
टोळक्याकडे शस्त्र असल्याने तक्रारदाराने रोहित यांना घरात बोलावले. त्यानंतर तक्रारदार खिडकीतून बाहेर डोक्यावल्या असता, एका चोरट्याने त्यांना शस्त्र दाखविले. हा तपास पोलिस उप.निरीशक. भैरवनाथ शेळके करीत आहेत.