महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चालू २०२४ या आर्थिक वर्षात ११ ऑगस्टपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक २२.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता हे उत्पन्न सुमारे ६.९३ लाख कोटी रुपये झाले आहे, असे केंद्रसरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.
यात ४.५७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि २.२२ लाख कोटी रुपये व्यावसायिक कर समाविष्ट आहे. सिक्युरिटीज ट्रान्झेंक्शन टॅक्स (एसटीटी) २१,५९९ कोटी रुपये जमा झाला असून, १,६१७ कोटी रुपये इतर कर आहेत.
एक एप्रिल ते ११ ऑगस्ट दरम्यान १.२० लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. त्यात वार्षिक ३३.४९ टक्के वाढ झाली आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलन २४ टक्क्यांनी वाढून ८.१३ लाख कोटी रुपये झाले असून, त्यात ४.८२ लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर आणि ३.०८ लाख कोटी रुपयांचा व्यावसायिक कर समाविष्ट आहे.
सरकारने चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करातून २२.०७ लाख कोटी रुपये गोळा करण्याचे बजेट ठेवले आहे. किरकोळ महागाई दर नीचांकी स्तरावर आली आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाई दर जुलैमध्ये पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
हा दर ३.५४ टक्के नोंदवला गेला असून, यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये महागाईदर चार टक्क्यांच्या खाली आला होता. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई जून २०२४ मध्ये ५.०८ टक्के आणि जुलै २०२३ मध्ये ७.४४ टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याची महागाई जुलैमध्ये ५.४२ टक्के होती. जूनमधील ९.३६ टक्क्यांवरून ती चांगलीच खाली आली आहे.