जलविद्युत प्रकल्पांमध्ये होणार २४ हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जलसंपदा विभाग व महाजेनको, द टाटा पॉवर लि., आवाडा ग्रुप यांच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पांसदर्भात सामंजस्य करार करण्यात आले.
याद्वारे राज्यात २४,६३१ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, यातून ५,६३० मेगावट क्षमतेच्या वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अंदाजे १०,३०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीही होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्यादी अतिथीगृह येथे हा सामंजस्य करार झाला. यावेळी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामंजस्य करार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०३० पर्यंत राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीद्वारे पूर्ण करण्याच्या दूरदर्शी योजनेची रूपरेषा तयार झाली आहे.
राज्याच्या प्रगतीसाठी याद्वारे वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्तता, तसेच शाश्वत आणि हरित ऊर्जा निर्मितीद्वारे राज्याच्या ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.