वर्धमान प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्ताने विचारांचा जागर
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : विकार आणि विशाद यामुळे जीवनात आपण अनेकदा अस्वस्थ होत असतो. आपले मन अशांत होत असते. आपले मन विशादाने भरलेले असते. परंतु भक्तीचा प्रकाश आणि परमेश्वराची आस्था प्राप्त झाली की आपले मन प्रसन्नतेने भरून जाते. म्हणून जीवनात भक्तीचा प्रकाश महत्त्वाचा आहे. भक्तीमार्गात परमेश्वरामध्ये लीन होण्यातच खरे समाधान दडलेले आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला आयोजित केली आहे. या निमित्ताने अनेक भाविक उपस्थित होते. आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या, आज १५ आॅगस्ट अर्थात देशाचा स्वातंत्र्यदिन. देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा जो आनंद, उत्साह लोकांमध्ये होता तो आजही माझ्या स्मृतीमध्ये आहे. या नंतर त्यांनी भक्तीमार्गाचे महत्त्व कथन केले. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, साधनेच्या मार्गामध्ये तीन मार्ग आहेत. त्यात एक ज्ञानाचा मार्ग, दुसरा क्रिया मार्ग आणि तिसरा भक्तीचा मार्ग आहे.
भक्तीचा मार्ग म्हणजे त्या परमात्म्याप्रती आपली समग्र श्रद्धा आणि समग्र समर्पण. आपण भक्तीमार्गामध्ये संपूर्णपणे स्वतःला अर्पण करतो. ईश्वराच्या चरणाशी आपण लीन व्हावे म्हणजे आयुष्याचे सार्थक होते. भक्तीमार्ग वरकरणी आपल्याला खूप सोपा वाटतो.
परंतु माझ्या मते भक्तीमार्ग हा ज्ञानमार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानमार्गात आपल्याला स्वतःसह सर्व प्रकृतीला जाणून घ्यायचे आहे परंतु भक्तीमार्गामध्ये मात्र आपण स्वतःला संपूर्णपणे ईश्वराच्या चरणाशी सोडून द्यायचे आहे. भक्तीमार्गामध्ये ईश्वरासह त्याची कृपा असलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी भक्तीभाव आहे. भक्तीच आपल्याला आनंद प्रदान करते. ईश्वराच्या मार्गावर चालण्याचा भाव मनात निर्माण होतो. जीवनातील विशाद दूर करण्याचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे.
प. पु. साध्वी श्री. संघमित्राजी म्हणाल्या, जीवन हे विविधतांनी भरलेले आहे. जीवनात विविध रंगांनी आपण आपले आयुष्य सजवतो. त्यामुळे विभिन्नतांचा स्वीकार करण्यातच आपले हीत असते. आपल्या परिवारात, समाजात, देशात विविधता असणार हे लक्षात घेतले पाहिजे. हे आपल्या सामूहिक चेतनेचे प्रतिक आहे.
कमळाच्या फूलातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. ते चिखलात उगवते पण स्वतःला पवित्र ठेवते. कितीही विषमता असली तरी आपण स्वत्व जपू शकतो हेच कमळाकडून आपण शिकले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याचा सोहळा जेव्हा साजरा केला जातो. तेव्हा विकृतींपासून आपण स्वतंत्र कसे होऊ शकतो हे आपण पाहायला हवे. सेवा करण्यासाठी, ईश्वरावर प्रेम करण्यासाठी आपण स्वतंत्र आहोत हे लक्षात घेऊन आपण जीवन जगायला हवे.