कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये घरफोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केलेल्या आरोपीस अटक करण्यात कोंढवा तपास पथकास यश आले आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये घरफोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व शाहिद शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी अमोल अवचरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) व त्याचा साथीदार तौसिफ (रा. कोंढवा, पुणे) हे रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर उचकटुन चोरी करणारे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर बातमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे व स्टाफ अमोल अवचरे याचा शोध घेण्यासाठी कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे गेले असता सदर कासेवाडी परिसरात आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अमोल अवचरे हा त्याच्याकडील काळ्या रंगाच्या होंडा डिओ दुचाकी वरुन जाताना दिसुन आला.
त्याप्रमाणे लागलीच पोलीस स्टाफने त्याचा पाठलाग करुन कासेवाडी लगत असलेल्या जैन मंदीराच्या समोरील सार्वजनिक रोडवर थांबवुन त्यास त्याचे नाव पत्ता वीचारला असता त्याने त्याचे नाव अमोल किसन अवचरे (वय २७ वर्षे, रा. कॉलनी नंबर १० समोर, म्हसोबा मंदीरा शेजारी, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे असल्याचे सांगितले.
त्यास त्याच्याकडे असलेल्या दुचाकी गाडीबाबत तसेच गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवुन कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणले. त्याला विश्वासात घेवुन त्याच्याकडे तपास करून त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार तौसिफ (रा. कोंढवा, पुणे) याच्यासह केला असल्याचे सांगितले.
तसेच सदर गुन्हा करताना त्याच्याकडे असलेली होंडा डिओ दुचाकी गाडी ही वापरली असल्याचे सांगितले. सदर २५,०००/- रु. किंमतीची होंडा डिओ दुचाकी, तसेच सदर गाडीच्या डिकीमध्ये एक धारदार लोखंडी कोयता, गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एक ५,०००/- रु. किंमतीची १०० ग्रॅम वजनाची श्री कृष्णाची चांदीची मुर्ती त्यास सोनेरी पॉलिश केलेली तसेच १३,५००/- रु. किंमतीची एकुण २७ नग चांदीचे नाणे मिळुन आले आहे.
सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याने व त्याचा साथीदार तौसिफ शेख यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केल्याचे मान्य केल्याने त्यांच्याकडुन शटर उचकटून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा तपास पथकास यश आले आहे.
ही कारवाई, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे आर.राजा, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक बालाजी डिगोळे, सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलीस अंमलदार गोरखनाथ चिनके, शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले यांच्या पथकाने केली.