विमानात सीटवरून हाणामारी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव विमानतळावर ‘इंडिगो’ च्या विमानातून पुणे ते दिल्ली प्रवास सुरू होण्यापूर्वी सीटवर बसण्याच्या कारणावरून महिलेने प्रवासी दाम्पत्याशी वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे विमानतळ आहे का एसटी स्टँड असा प्रश्न प्रवाशांना पडला.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने प्रवासी दाम्पत्याशी वाद घातला.महिला कॉन्स्टेबलच्या हाताला चावा घेतला.पोलिसांकडून त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. विमान कंपनीने तत्काळ केंद्रीय औद्योगिक दलाच्या जवानांना पाचारण केले. विमानातील प्रवाशांची भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिला कॉन्स्टेबलला या महिलेने मारहाण केली.
तसेच हाताचा चावा घेतला. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. मारहाण करणाऱ्या महिलेला ‘सीआयएसएफ’ ने ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबल प्रियांका रेड्डी यांनी तक्रार दिली.
त्यावरून सुरेखा सिंह (वय ४४, रा. संतोषनगर, वाकड) या महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंडिगोचे शनिवारी सकाळी पुणे ते दिल्ली विमान होते.
आरोपी महिला सुरेखा सिंह शनिवारी दिल्लीला जाण्यासाठी विमानात आली. त्या वेळी सीटवर बसण्याच्या कारणावरून तिने प्रवाशांशी वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. विमान कर्मचाऱ्यांनी तत्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इंडिगो’च्या विमानात बेकायदा प्रवेश करून, बनावट तिकीट काढून विमानातून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर आता सीटवर बसण्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली आहे.