भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ मध्ये अंत्यसंस्कार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महासाध्वी आगमाचार्य पू.पु. श्री मंजुश्रीजी म. सा. यांच्या संथारा व्रताची पुर्णाहूती झाली आहे. भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो समाज बांधव उपस्थित होते.
भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ व गुरूमॉ मंजुश्रीजी गोशाळाचे शिल्पकार व प्रेरणास्थान, जेष्ठ महासाध्वी, आगमाचार्य, जिनशासन सौरभ, साहित्य रत्न, डॉ. पू. पु. श्री मंजुश्रीजी म. सा. यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता संथारा व्रत धारण केले होते.
त्यांच्या संथारा व्रताची रात्री १० : ४५ मिनिटांनी पुर्णाहूती झाली. त्यांच्या संथारा व्रताची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. त्यांच्या संथारा व्रताची पुर्णाहूती झाल्यानंतर सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजता त्यांची सजविलेल्या डोलीची शोभायात्रा काढण्यात आली व भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ मध्ये त्यांच्यावर ट्रस्टीच्या वतीने अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रसंगी अनेक समाजातील मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी मनोगत व्यक्त करून प्रास्ताविक भाषण केले तर ललित शिंगवी यांनी आभार मानले, सुत्र संचालन पवन भंडारी यांनी केले, तसेच पारस मोदी, महावीर नहार व राजेंद्र लुंकड यांनी मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली. महासाध्वी आगमाचार्य प. पू. श्री मंजुश्रीजी म. सा. यांची स्मृती कायम राहील यासाठी या संस्थेच्या प्रांगणात स्तंभ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांनी सहयोग देण्याचे घोषित केले.
गुरूवार दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गौरव सभेचे आयोजन केले आहे. यावेळी भामाशाह रमणलाल लुंकड परिवाराच्या वतीने गौतम प्रसादी ठेवण्यात आली होती. मागील तीन महिन्यापासून त्यांची तब्येत नरम-गरम होती. त्यांच्या प्रेरणेने भिवरी येथे जागा घेऊन तेथे जयती जैनम साधना तीर्थ या संस्थेची स्थापना करून त्या तेथेच ठाणापती झाल्या होत्या. २०१८ पासून त्यांनी आपले चातुर्मास याच संस्थेत करून या संस्थेची अधिक प्रगती केली व संस्था नावारूपाला आणली, या संस्थेच्या माध्यमातून दि, १७ मार्च २०२४ रोजी याच जागेत भव्य दिव्य अशा गो-शाळेची उभारणी केली.
यासाठी सुनिल लुणावत, ललित शिंगवी, राजेंद्र मुनोत, रमणलाल लुंकड, महावीर नहार, पवन भंडारी, महेश संचेती या सर्वांनी खूप परिश्रम घेतले होते. पू. पु. श्री मंजुश्रीजी म. सा. ह्या मूळ दिल्ली येथील चोरडिया परिवारातील असून त्यांनी महाश्रमणी प. पू. श्री कौशल्यादेवीजी म. सा. यांच्या सान्निध्यात दि.२३ एप्रिल १९६१ साली चांदणी चौक, दिल्ली येथे दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आजपर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, आन्ध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा राज्यात चातुर्मास करून अहिंसेची शिकवण दिली व त्यांच्या प्रेरणेने अनेक धार्मिक संस्था त्यांनी नावारुपाला आणल्या आहे.
त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत, पाली, राजस्थानी, हरियाणी आदी भाषेचे ज्ञान होते. श्रमण संघाच्या साध्वीगणामध्ये पी. एच. डी. करून डॉक्टरेट पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या साध्वी आहेत. एक महान क्रियाशील साध्वी म्हणून त्यांची ओळख होती. सदैव हसतमुख, प्रेमळ व शांत, समजूतदार व गोड बोलणे आणि कायम उत्साही, आनंदी असा त्यांचा ठेवा होता, संस्कृत व प्राकृत या विषयावर त्यांचा मोठा अभ्यास होता.














