खडकी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथील बेपत्ता असलेल्या तरुणाने खडकीत रेल्वे ट्रॅकवर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत खडकी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकस्मात मयत झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ जून रोजी घडली आहे. ऋषिकेश जयदेव म्हसारे (वय २७ वर्षे रा.स.नं.१५ इनामनगर कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी तो घरातून निघून गेला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्याचा फोटो वडिलांनी ओळखला. काही लोक त्याला त्रास देत होते. त्यामुळे तो मानसिक दृष्ट्या खचला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव तपास करीत आहेत