वर्धमान प्रतिष्ठानमध्ये विचारसुमनांचा सुगंध
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपली सर्व अध्यात्मिक शास्त्र हे श्रुतज्ञानातूनच आलेले आहेत. तीर्थकरांचे ज्ञान आपण ऐकतो आणि शब्दांच्या माध्यमातून ते कानावर पडते आणि आपण ते श्रवण करतो. म्हणून आपण शास्त्राची उपासना करतो. त्यामुळे सर्वांत जास्त उपकारी, उपयोगी असे ज्ञान म्हणजे श्रुतज्ञान आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात त्यांनी आज शब्दांचे महत्त्व किती आहे हे सांगितले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री संघमिश्राजी यांनी मार्गदर्शन केले.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, आपल्या मनातील जसे भाव असतात तसे आपले शब्द बाहेर पडतात. शब्दांच्या माध्यमातून अनेक तरंगे सगळ्या विश्वात पसरत असतात. त्या समवेत आपले भावसुद्धा पसरत असतात.
शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे भाव असतात. त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून दोन्ही प्रकारचे भाव प्रसारित होत असतात. मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या कशायातून मुक्त व्हावे लागते. जीवनाला जो शांती मिळवून देतो, आनंद मिळवून देतो, प्रसन्नता प्रदान करतो ते शुभ कशाय आहेत.
शरीराची इच्छा पूर्ण करणे हे अशुभ नाही. आपण साधु संत, गरीबांना दान देतो तेव्हा त्यांची भूक भागवतो तेव्हा ते पुण्य असते. मग आपण स्वतःच्या शरीराची भूक भागवली तर ते पाप कसे असेल. मतिज्ञान आणि श्रुतज्ञान हे ज्ञानाचे प्रमुख प्रकार आहेत. ज्ञानाच्या पूजेतच आपल्याला खरा आनंद मिळतो.
श्रुतज्ञानाची पूजा केली जाते. कारण ते अधिक महत्त्वाचे आहे. जे कानाने ऐकले जातात ते शब्द इतरांसाठी महत्त्वाचे असतात. आपण जेव्हा शब्दांचे उच्चारण करतो तेव्हा ते आपल्या मनापर्यंत पोहोचतात. शब्दांसमवेत भाव असतात. जो एक शब्द आपण बोलतो तो आकाश व्यापण्याची क्षमता राखून असतो.
जीवनाला अध्यात्मिक बनवणे हे फार महत्त्वाचे आहे. आपले भौतिक जीवन सुख शांती समृद्धीने परिपूर्ण असावे आणि अध्यात्मिक जीवनही प्रसन्नतेने भरलेले असावे. त्यासाठी आपण सर्वांनीच सजगतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सत्याला पाहण्याचे दृष्टिकोन आपण आत्मसात केले पाहिजेत. सत्याला पूर्णत्वाने स्वीकार करून त्याचा श्रद्धाभावाने स्वीकार करणे गरजेचे आहे.