महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्यात मालवण राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला.
त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा पुतळा पुन्हा उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. शिवप्रेमींमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्याचे संतप्त पडसाद उमटले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी भागात कदळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (दि. २६) वादळी वा-यासह मुसळधार पाऊस सुरू असताना राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा प्रकार लक्षात घेता, स्थानिकांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली. शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली.
तहसीलदार वर्षों झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाभरातून पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. पुतळ्याच्या ठिकाणी प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शिवरायांच्या या ३५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पुतळा पडण्याची घटना दुर्दैवी आहे. ताशी ४५ किमी वेगाच्या वाऱ्यामुळे हे नुकसान झाले. नौदलासह आमचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.
शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा त्याच ठिकाणी दिमाखात मजबूतीने उभा करण्याचे काम आम्ही करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मे. आर्टिस्टीया कंपनीचे मालक जयदीप आपटे, सल्लागार चेतन पाटील यांच्यासह संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. ‘आठ महिन्यांतच पुतळा कोसळला, ही दुर्दैवी बाब आहे. पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती, मग हा प्रकार पहिला कसा?’ असा प्रश्न त्यांनी केला.
या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुतळा उभारणीच्या कामात असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला.

















