लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: वाहतूक कोंडी सोडवताना दोघांनी तरुणास मारहाण करून त्याच्या अंगावर गाडी घातल्याची घटना तुळापुर आळंदी रोडवर घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. फिर्यादी तरुण हा कुरकुंडी (ता. खेड, राजगुरुनगर) त्याच्या मित्रासह जात असताना वाहतूक कोंडी झाली होती.
फिर्यादी व त्याचा मित्र जगदीश शिवेकर कोंडी सोडवत होते. त्यावेळी जगदीशने रस्त्यात अडथळा करणाऱ्या तरुणांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले. यामुळे वाद वाढला. त्याला व मित्रांना मारहाण केली आणि त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जगदीशच्या पोटाला, तोंडाला आणि छातीला मार लागला. त्यांच्या गाडीचेही नुकसान करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गौरव दिपक लगड (वय २२ वर्ष, रा. पाथर्डी, अहमदनगर) आणि अविनाश बनकड शेळके (वय ३८ वर्ष, रा. आळंदी, पुणे) यांना अटक केली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे करीत आहेत.















