वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन
पुणे : “महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच आहेत आणि सर्वजीवकल्याणामध्येच आपले कल्याण सामावले आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, “आपलेही शब्द आहेत, शब्दाला अंत नाही. आपण जे बोलतो, तेवढेच आपण स्पर्शाने आणि आवाजाने जाणतो, परंतु सगळ्यात जास्त आपण शब्दांनी जाणतो.
जगात कधीही शब्द कमी पडत नाहीत. स्पर्श कमी होतो, लोभ कमी होतो, स्वार्थ कमी होतो, पण शब्द कधीच कमी होत नाहीत. आपण सगळ्यात जास्त कसे जाणतो? कानाने, हाताने, तोंडाने की नाकाने? आपण कानाने सर्वात जास्त जाणतो.
सगळ्यात जास्त जाणून घेण्याचा उपाय कानच आहे. प्रभूला कसे जाणायचे? आपण प्रभूला स्पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही. परंतु प्रभूच्या वाणीला हजारो वर्षांनंतरही आपण ऐकू शकतो. ते शब्द आपण पुनः उच्चार करू शकतो. त्या शब्दांच्या पथावर चालण्याचा आपण थोडेफार का होईना पण प्रयत्न केला पाहिजे.
स्तुती हा त्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग आहे. जेव्हा ग्रंथांची स्तुती केली जाते, तेव्हा तिच्यासोबत भावना येतात. या शब्दांच्या विश्वात जर कुठला महत्त्वाचा शब्द आहे, तर तो जीवनाचा निर्माण करणारा शब्द आहे. आपण ऐकण्या, बोलण्याच्या आणि बघण्याच्या शब्दात काय अंतर आहे? तर आपण जे ऐकतो, तेच बोलतो.
आपल्या शब्दांमध्ये भक्तिसोबत भावना असतात. तेव्हा आपण परमात्म्याची भक्ती करतो, तेव्हा शब्द शब्द नसून भक्तीत रूपांतरित होतात. शब्दांची अनंत तृष्णा असते. जो विज्ञानाला जाणतो, तो महावीर आहे. आपण स्तुती करून भक्ती करतो.
आपण पृथ्वीला माता का म्हणतो? कारण पृथ्वीने सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीवर छोटेसे बी पेरून लोक आपले जीवन सुरू करू शकतात, पृथ्वीमुळेच ते तग धरू शकतात. त्यामुळे पृथ्वीविषयी विनम्र होऊन जगता आले पाहिजे.”
















