सोलापूर जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : ज्या गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” संकल्पना राबवली जाईल, अशा सोलापूर जिल्ह्यातील गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्तिपत्र देण्यात येईल. तसेच, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रथम तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
श्री गणेशोत्सव २०२४ अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे घेण्यात आली. या बैठकीत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलत होते.
गणेशोत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी त्यांनी सूचनाही दिल्या. बैठकीसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवळेकर, यामावार, भोसले तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले.
असा साजरा व्हावा गणेशोत्सव :
ज्या गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” संकल्पना राबवली जाईल, अशा गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्तिपत्र देण्यात येईल.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रथम तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल.
उपविभाग स्तरावर उपविभागातील प्रथम तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल.
सर्व उपविभागातील तीन उत्कृष्ट मंडळांपैकी तीन उत्कृष्ठ मंडळांना जिल्हा स्तरावर बक्षीस देण्यात येईल.
पर्यावरणपूरक व डीजे/डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा.
प्रत्येक सार्वजनिक मंडळांनी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशी सूचना देण्यात आली आहे.
ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये एकाच दिवशी ईद-ए-मिलाद आणि गणेश मंडळांच्या मिरवणुका निघणार असतील, अशा ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी समन्वय ठेवून मिरवणुका काढाव्यात, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
सदर उत्सवामध्ये जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवावेत.
