लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फोम मिक्सर मशीनमध्ये साफसफाईचे काम करताना अचानक मशीन सुरू झाल्याने एक कामगार ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास वडकीनाला येथील स्नुज हब कम्फर्ट अॅण्ड स्लिप रेडीफाईन्ड या कंपनीत हा अपघात झाला.
या प्रकरणी कैलाश भारत कोल (वय २१ वर्षे, रा. वडकीनाला) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचा साथीदार मोहम्मद असरद अंसारी (वय २० वर्षे) हे कंपनीत फोम मिक्सर मशीनमध्ये उतरून साफसफाईचे काम करीत होते.
त्याचवेळी, मशीन ऑपरेटरने मशीनमध्ये कोणी काम करत आहे का, हे न पाहता निष्काळजीपणे व हयगयीने मशीन सुरू केली. यामुळे फिर्यादीचा पाय मशीनमध्ये अडकून त्यांना दुखापत झाली, तसेच मोहम्मद असरद अंसारी यांचे दोन्ही पाय व शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.

















