बार्शी शहर पोलिसांची मध्यप्रदेशात जाऊन कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीविरूद्ध बार्शी शहर पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन कारवाई केली असून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाइल,सीम कार्ड,एटीम कार्ड जप्त केली आहेत.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे २९ मे २०२४ रोजी डॉ. सुजित वसंत काटकर (वय ५० व्यवसाय डॉक्टर रा.पाटील प्लॉट, बार्शी) यांनी तक्रार दिली होती. दि. ०५ जानेवारी ते दि. ०५ फेब्रुवारी २०२४ च्या दरम्यान त्यांचे मोबाईलमध्ये अँप्लीकेशन उघडण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देतो असे सांगून ९,५०,०००/- रूपयाची फसवणूक केली होती.
असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करून तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपिंची नावे निष्पन्न करून मोबाईल लोकेशनद्वारे त्यांचा शोध घेण्यात आला. सदर आरोपीचे लोकेशन हे इंदोर (राज्य मध्यप्रदेश) येथे असल्याने बार्शी शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तात्काळ एक पोलीस पथक तयार करून इंदोर येथे पाठविले.
पोलीस पथक यांनी इंदोर येथे जावून गुन्हयातील संशयीत आरोपी लाला उर्फ कमल नरेंद्र सोनी (वय. ३५ वर्षे रा. कनावटी, निमच ता.जि.निमच राज्य मध्यप्रदेश) भगवानदास उर्फ विकी कन्हैयलाल आवताणी (वय. ३८ वर्षे रा. विकास नगर, निमच ता.जि.निमच राज्य मध्यप्रदेश) मनीष घनशाम बैरागी (वय ३० वर्षे रा. भगाणा रेल्वे स्टेशनजवळ, निमच ता.जि.निमच राज्य मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले.
त्यांना ताब्यात घेताना त्यांच्याकडे एक लॅपटॉप, १६ मोबाईल्स, ८६ विविध कंपनीचे सिमकार्ड, १५ बँकेचे चेकबुक व पासबुक, ०८ ए.टी.एम असे मिळून आल्याने जप्त करण्यात आलेले आहे. सदर आरोपींना बार्शी येथे आणून दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली.
सदर आरोर्पीना न्यायालयात हजर केले असता त्यातील मुख्य आरोपी क्रं.१ यास ०५ दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे व आरोपी क्रं २ व ३ यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्यामध्ये आतंरराज्यीय ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी आहे त्यांचा शोध घेणे सुरू आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, 
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या अधिपत्याखाली सपोनि दिलीप ढेरे, सपोनि बाळासाहेब जाधव, पो. उप. नि. महेश गळगटे, पो. उप. नि. उमाकांत कुंजीर व पोलीस अमंलदार बाळकृष्ण डबडे, लखन घाडगे, सचिन नितनात, गणेश अंकुशराव, धनराज फत्तेपुरे, अविरथ बरबडे यांनी तसेच सायबर पोलीस विभाग सोलापूर येथील रतन जाधव यांनी केलेली आहे.

 
			

















