महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यामार्फत सन २०२४ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुलाखे हायस्कूल बार्शी चे सहशिक्षक जयसिंग कदम यांना दि. १४ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला त्या पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श शिक्षकाची निवड करण्यात येते. बार्शी तालुक्यातून हा मान जे.पी. कदम यांना मिळाला.
हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, महानगरपालिका शिक्षण प्रशासनाधिकारी संजय जावीर, मुख्याध्यापक संघाच्या नियंत्रक समितीचे अध्यक्ष सुभाष माने, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, उपशिक्षणाधिकारी हवेली मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेली २३ वर्ष सुलाखे हायस्कूल बार्शी येथे सहशिक्षक म्हणून काम करीत असताना जे. पी. कदम यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले विविध उपक्रम, कृतीयुक्त अध्यापन, अभ्यासेतर उपक्रम यामुळे त्यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली.
जे. पी. कदम हे M.A.D.ED. NET, SET असून त्यांची ‘प्रादेशिक बोलीतील निवडक कथाकरांचा अभ्यास’ या विषयावर PH.D चालू आहे. त्यांनी ‘Learnwell English Basic’ या इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाची तसेच ज्ञानसमृद्धी इंग्रजी प्रश्नपत्रिका संच इ. ५ वी, ६ वी व ७ वी या इंग्रजी प्रश्नपत्रिका संचाची निर्मिती केली आहे.
Learnwell Basic या शैक्षणिक यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयावरील ३५० हून अधिक व्हिडिओज ची निर्मिती केली आहे व त्यांचे १९५०० सबस्क्राईबर्स देखील आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे व सहकारी मित्र यांनी अभिनंदन केले.
