भारत जैन महामंडळाच्या वतीने सामुदायिक क्षमापना कार्यक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
मुंबई: भारत जैन महामंडळाच्या वतीने, समाजात उल्लेखनीय कार्य करणारे पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, समाज भूषण, दानशूर भामाशाह रमणलाल लुंकड यांना “जैन समाज रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे १२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारत जैन महामंडळाच्या वतीने रविवारी (दिनांक २२ सप्टेंबर) विश्व मैत्री दिवस व सामुदायिक क्षमापना अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मुंबई सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात झाला.
याप्रसंगी आचार्य पू. श्री. मतिचंद्रसागर सुरीश्वरजी म.सा., आचार्य पू. श्री. विजयप्रभाकर सुरीश्वरजी म.सा., राष्ट्रसंत पू. श्री. नम्रमुनिजी म.सा., क्रांतिकारी संत मुनिश्री १०८ पू. श्री. प्रणुतसागरजी म.सा., मुनि १०८ पू. श्री. जयन्द्रसागरजी म.सा., महा साध्वी पू. श्री. मंगलप्रज्ञाजी म.सा. आदी ठाणा, असे चारही संप्रदायाचे साधु-साध्वीगण उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, कौशल्य रोजगार विकास कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यसभेचे सदस्य मिलिंद देवरा, राज्यसभेचे सदस्य राहुल शेवाळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुभाष रुणवाल, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. सी. डांगी, सुमतिलाल कर्नावट, राकेश जैन, के. सी. जैन, चंदाजी रुणवाल, राजकुमारी बोरा, लताजी डांगी, नरेंद्र हिरावत, माणकलाल शाह, अंजली बिड़ला आदी मान्यवर स्टेजवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात युवा गायिका अभिलाषा बाठीया यांनी नवकार मंत्राने केली. भारत जैन महामंडळाच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणारे पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, समाज भूषण, दानशूर, भामाशाह रमणलाल लुंकड यांना जैन समाज रत्न हा पुरस्कार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्या शुभहस्ते व मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. सी. डांगी, उद्योगपती सुभाष रुणवाल, राकेश जैन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला व त्यांचा गौरव करण्यात आला.
यानंतर मुंबई येथील उद्योजक प्रशांत जैन, नेपाळ मधील वीरारनगर येथील उद्योजक किसनलाल दुगड, चेन्नई येथील उद्योजक रमेश मुथा व राजस्थान मधील जोधपूर येथील ८४ वर्षांच्या सेवाभावी, उद्योजिका सुशीलादेवी बोरा यांना चंदाजी रुणवाल, राजकुमारी बोरा, लता डांगी समवेत ओम बिरला यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तसेच यानंतर पर्यावरणात काम करणारे शशिकिरण जैन व राजस्थानमध्ये प्रकाशित होणारे “शताब्दी गौरव” या समाचार पत्राचे संपादक सिध्दराज लोढा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुलाल बाफना यांनी केले, तर सर्व पुरस्कारार्थींचे व प्रमुख पाहुण्यांचे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष सी. सी. डांगी यांचा परिचय सिमरन आहुजा यांनी करून दिला. भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. सी. डांगी यांनी प्रास्ताविक केले, ज्यामध्ये १२५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या संस्थेची माहिती दिली.
त्यांनी चारही संप्रदायांचे सर्व आचार्य व साधुसंतांनी संवत्सरी महापर्व हे सर्वांनी तिथीनुसार एकाच दिवशी साजरे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.















