महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ म्हणजे सोलापूरच्या विकासाचा रनवे अवकाशात झेपावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने या विमानसेवेचे उद्घाटन झाले असून, सोलापूरसाठी ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.
फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोलापुरात विमानसेवेचा शुभारंभ झाला होता. उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर या ७२ आसनी विमानसेवेची सुरुवात काही दिवसांतच बंद पडली होती.
या विमानसेवेच्या मदतीने सोलापूरकर केवळ ४० ते ४५ मिनिटांत पुणे शहर गाठू शकतील. अन्यथा, रेल्वे किंवा रस्तामार्गे सोलापूरहून पुणे गाठण्यासाठी साधारणतः साडेचार ते पाच तास लागतात. त्यामुळे आता वेळेची बचत होणार आहे.
याचा उद्योजक, व्यापारी, कारखानदार, सरकारी अधिकारी, तसेच विद्यार्थी वर्गाला मोठा फायदा होईल. भविष्यात ही विमानसेवा तिरुपती, हैदराबाद, बंगळुरू या शहरांमध्येही सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविक, उद्योजक, व्यापारी, कारखानदार आणि आयटी क्षेत्रातील गुणवंतांसाठी सोलापूरचे आकर्षण वाढणार आहे. परिणामी येथील जमिनींची किंमत नक्कीच वाढणार आहे.
तिरुपती बालाजी भक्तांची सोय –
सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची मोठी सोय होईल. सोलापूरहून तिरुपतीला जाणारे अनेक भाविक आहेत. यापूर्वी या भाविकांना गुलबर्गा किंवा कोल्हापूर येथून विमानाने तिरुपतीला जावे लागत असे, परंतु आता वेळ, परिश्रम आणि पैसा वाचणार आहे. सोलापुरातील आयटी क्षेत्रातील विद्यार्थी पुणे, हैदराबाद, बंगळुरू येथे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच, तेलगू भाषिक रहिवासी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून आलेले आहेत. त्यामुळे सोलापूर-हैदराबाद विमानसेवा त्यांच्यासाठी मोठी सुविधा ठरेल. सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर या ठिकाणी उद्योगांसाठी जमीन मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत, अनेक उद्योग सोलापुरात येऊ शकतात. परिणामी भविष्यात येथे रोजगाराच्या संधी वाढतील. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, आयटी कंपन्यांसह डाळिंब क्लस्टरचा विषय आता मार्गी लागेल. येत्या काही महिन्यांत सोलापूरमध्ये ४६२ कोटींचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

