राज्य शासनाचा निर्णय : ६० कोटींचा निधी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराचा वाढलेला विस्तार, वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी येथे नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने पुणे शहरातील सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली असून, त्यासाठी ६० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
नवीन पोलीस ठाण्यांमध्ये कामकाजासाठी ८१६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आठवड्याभरात सातही ठिकाणी कामकाज सुरू होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी येथे नवीन पोलीस ठाणी सुरू होणार आहेत. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नव्याने पोलीस ठाणी सुरू करण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने प्राधान्य दिले आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि विस्तार लक्षात घेऊन पुण्यात नवीन सात पोलीस ठाणी सुरू करण्यास मान्यता मिळाल्यामुळे पोलीस ठाण्यांवर पडणारा कामकाजाचा ताण कमी होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे पोलिसांच्या कामकाजाची विभागणी होईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. दसऱ्यापूर्वीच नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू होईल.
गेले तीन ते चार वर्षे नव्या पोलीस ठाण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यात नवीन इमारत बांधण्यात येणार असून, २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुण्यातील नवीन पोलीस ठाणी (कंसात उपलब्ध निधी) :
- खराडी पोलीस ठाणे (सात कोटी ५० लाख)
- फुरसुंगी पोलीस ठाणे (आठ कोटी ८१ लाख)
- नांदेड सिटी पोलीस ठाणे (आठ कोटी ६० लाख)
- वाघोली पोलीस ठाणे (आठ कोटी ७५ लाख)
- बाणेर पोलीस ठाणे (आठ कोटी ६० लाख)
- आंबेगाव पोलीस ठाणे (सात कोटी ९ लाख)
- काळेपडळ पोलीस ठाणे (दहा कोटी २४ लाख)

