विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.
यावर्षीच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात गुरुवारी घटस्थापनेने होणार असून पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. नाँदमृदंग महिला ढोल पथकाच्या वादनाने घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.
याबरोबरच नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्तम् मंत्र सामूहिक पठण आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी फ्लॅश मॉबचे आयोजन देखील करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवामध्ये सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते ९ च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचंडी महायज्ञ दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी होणार आहे. तसेच, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच, कन्यापूजन करण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरण विषयी चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
देवीचं रुप असलेल्या माता-भगिनींचा सन्मान
नवरात्र उत्सव हा देवीचा उत्सव आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या घरातील माता-भगिनींना देवीचे रुप मानले जाते . त्यामुळे नवरात्र उत्सवात खऱ्या अर्थाने या माता-भगिनींचा सन्मान झाला तर, साक्षात देवीमातेचाच सन्मान झाल्यासारखं आहे. त्यामुळे या माता-भगिनींच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न माँ आशापुरा माता मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवात केला जातो. यावेळी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. याबरोबरच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आपण या नवरात्र उत्सवात माता-भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि आशापुरा मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी अवश्य यावे, अशी इच्छा आहे.
विजय भंडारी, अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट

