अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सुखसागरनगरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमाकडून ५,००,०००/- रुपये किमतीचा गुटखा आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे आणि स्टाफ दि. ३० सप्टेंबर रोजी सुखसागरनगर लेन नंबर ४ येथे गस्त घालत असताना एक लाल रंगाचा तीन चाकी टेम्पो वेगाने जाताना दिसला.
संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून चिंतामणी रेसिडेन्सी समोर सुखसागरनगर, पुणे येथे टेम्पो पकडला. चालक अक्षय तुकाराम सुरवसे (वय ३० वर्षे, रा. बी-५८/७, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
टेम्पोची झडती घेतली असता त्यात ४,७९,६००/- रुपये किमतीचा गुटखा (तंबाखूजन्य पदार्थ) आणि ५०,०००/- रुपये किमतीचा लाल रंगाचा तीन चाकी टेम्पो असा एकूण ५,२९,६००/- रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदीप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, आणि दयानंद तेलंगे-पाटील यांनी केली.

