अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भवानी पेठेत गांजा विक्री करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथक १च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ ऑक्टोबर रोजी नवलखा बिल्डींगच्या समोर भवानी पेठ या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक तसेच अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते.
त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम हातात नायलॉनची पिशवी घेऊन संशयास्पद रितीने कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव इसाक जैनुद्दीन शेख (वय ५३ वर्षे, रा. चमडी गल्ली, भवानी पेठ, पुणे) असून त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण २९,३१०/- रुपयांचा ऐवज आढळला.
त्यामध्ये १८,१६०/- रुपये किंमतीचा ९०८ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आणि ११,१५०/- रुपये रोख रक्कम, तसेच छोट्या १५ प्लॅस्टीकच्या पारदर्शक पिशव्या होत्या. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, नुतन वारे आणि योगेश मोहिते यांनी पार पाडली आहे.