पीएमआरडीए कडून लोणीकंदमध्ये पाच जणांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हवेली तालुक्यातील लोणीकंद भागातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत त्यांना काही दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. परंतु त्याचे पालन न झाल्यामुळे पीएमआरडीए कडून आता धडक कारवाई होत असून, सोमवारी (दि.७ ऑक्टोबर २०२४) रोजी गुन्हे नोंदविण्यात आले.
लोणीकंद (ता. हवेली) येथील स.नं. १६७ मध्ये अनधिकृत बांधकाम करणारे किशोर सूर्यकांत ढमढरे, लक्ष्मण श्रीपती ढमढरे, रफिक इक्बाल शेख, सागर दामोदर धोत्रे, अनिता संजय जोशी (सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली) यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशन येथे अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले.
संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएने वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस दिली होती. परंतु त्याचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५४(२) अन्वये लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले.
पीएमआरडीए हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावी व सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार सचिन मस्के, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांनी केली.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस दिल्यानंतर, सदर बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


















