चंदननगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भीक मागण्याचा बहाणा करून उघड्या दरवाजातून घरात घुसून सोने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून पोलिसांनी ३५ लाखांच्या दागिन्यांसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात घुसून सोने व रोख रक्कम चोरी झाल्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा तपास पोलीस पथकाचे अधिकारी आणि तपास पथकातील अंमलदार चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत करत होते. चोरीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे लाल रंगाच्या चारचाकी टेम्पो सारख्या गाडीची व चोरी करणाऱ्या महिलांची आणि इसमांची माहिती मिळाली होती.
सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर हे तपास पथकातील अंमलदारांसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्याच वेळी हवालदार नाणेकर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी पैसे व सोने चोरी करणारे फुटेजमधील वर्णनानुसार एक महिला व एक इसम आळंदी देवाची येथे एका लाल रंगाच्या चारचाकी टेम्पोसह उभे आहेत.
पथकातील अंमलदार व महिला स्टाफने त्या ठिकाणी छापा टाकून १) मिली दिपक पवार, वय २० वर्षे, राहणार आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक, व एक विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या महिंद्रा गाडीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे त्यांना पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस स्टेशनला आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोने व पैसे आढळले. त्या सोने व पैशांबाबत विचारपूस केली असता त्यांनी ते टिंबर मार्केट, पुणे येथील एका घरातून चोरी केल्याची कबुली दिली. खडक पोलीस स्टेशनमध्ये या चोरीचा गुन्हा दाखल आहे.
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी तीन महिन्यांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३५,००,०००/- रुपये किंमतीचे ५२ तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, २६,६००/- रुपये रोख रक्कम आणि ५,५०,०००/- रुपये किंमतीची लाल रंगाची चारचाकी गाडी, असा एकूण ४०,७६,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सूरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शीतल वानखेडे, पूजा डहाळे आणि मनीषा पवार यांनी केली आहे.

