बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे ऍड. एस. के. जैन कुटुंबास ‘आदर्श परिवार’ : लुंकड दाम्पत्यास ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “आई वडिलांचे संस्कार, त्याग, समर्पण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. पण माता-पित्याचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद आहे. आपल्या मातापित्याचा समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा सुषमा व संजय चोरडिया यांनी घेतेलेला वसा कौतुकास्पद आहे,” असे मत प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे रतनबाई व बन्सीलाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले. ऍड. एस. के. जैन व कुटुंबियांना पहिला ‘बन्सी-रत्न आदर्श परिवार राष्ट्रीय पुरस्कार’, तर आशाबाई व रमणलाल लुंकड दाम्पत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
शोभा धारिवाल यांना ‘समाजरत्न’, पोपटलाल ओस्तवाल यांना ‘समाज शिरोमणी’, सुभाष ललवाणी यांना ‘समाजभूषण’, माणिक दुग्गड यांना ‘गुरुसेवा’ व शेखर मुंदडा यांना ‘मानवसेवा’ राष्ट्रीय पुरस्कार-२०२४ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे सातवे वर्ष होते. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी जैन समाजातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बिबवेवाडी येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकावासी जैन श्रावक संघामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य डॉ. लोकेशमुनीजी होते. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार, माजी हवाईदल प्रमुख एअरमार्शल भूषण गोखले, संगीतकार अबू मलिक, ब्रह्मकुमारीजचे बी. के. दशरथ भाई, बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, प्राचार्य अजित शिंदे आदी उपस्थित होते.
विठ्ठल मणियार म्हणाले, “बन्सीलाल व रत्नबाई माझे जवळचे स्नेही होते. चोरडिया परिवाराचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. नाना पेठेत मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदात वावरणाऱ्या चोरडिया यांनी चांगल्या पदाची नोकरी सोडून पिढी घडविण्याचे काम हाती घेतले आहे.
तेही मी अतिशय जवळून पाहिले आहे. आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा संजय व सुषमा यांचा उपक्रम स्तुत्य आहे.” आचार्य डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, “इथे सन्मानित झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सेवेचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सेवा, त्याग व समर्पणाची आहे.
अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करून नव्या पिढीला घडविण्याचे काम संजय व सुषमा चोरडिया करत आहेत. त्यांच्यातील सकारात्मक विचाराने आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत आहे.”
एअरमार्शल भूषण गोखले म्हणाले, “समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे.
सूर्यदत्त शिक्षण संस्था नव्या पिढीमध्ये ही भावना रुजवण्याचे काम करत आहे. त्यासाठी समाजात ज्यांनी चांगले काम केले आहे, अशा लोकांना विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांना सन्मानित करत आहे. त्यातून चांगल्या पिढीचे निर्माण होण्यास मदत होईल.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सामाजिक व धार्मिक कार्यातून ज्यांनी आम्हाला घडवले त्या माता-पित्याच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सोहळा आयोजिला जातो. यंदापासून समाजातील आदर्श परिवाराचा व गुरुसेवा करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येत आहे.
आईवडिलांनी दिलेला संस्कार, शिकवण पुढील पिढीला देत राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी ‘सूर्यदत्त’ नेहमीच पुढे राहील.” शोभा धारीवाल म्हणाल्या,” आपण भावी पिढीला संपत्तीसह झाड लावण्याचे संस्कार द्यावेत. संपत्ती जगण्यासाठी आवश्यक असली, तरी त्यापेक्षा आपल्याला ऑक्सिजन अधिक महत्वाचा आहे.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून कार्यरत राहावे. आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात मला योगदान देता येत आहे, याचा आनंद वाटतो. रसिकलाल धारीवाल यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
ऍड. एस. के. जैन म्हणाले, “संजय चोरडिया व सूर्यदत्त परिवार सूर्याप्रमाणे सर्वांच्या जीवनात प्रकाश पसरवण्याचे काम करत आहे. आपण सर्वांनी त्यांचे अनुकरण करायला हवे. समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी घ्यावी.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. मनीषा कर्नावट व प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले. अबू मलिक व सहकाऱ्यांच्या गायन मैफलींनी उपस्थितांची मने जिंकली.

