राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाला सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी केलेल्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता.
या प्रतिष्ठानच्यावतीने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौकातून ऊंड्री-पिसोळी रस्त्यावर बाळासाहेब देवरस यांच्या नावाने एक हजार खाटांचे नियोजित रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे या चौकाला आणि भुयारी मार्गाला बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास मान्यता मिळाली आहे.
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे : राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करण्याची आग्रही मागणी होती. पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठीच्या विविध योजना या महामंडळांमार्फत चालवल्या जातील.

