विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी निर्जन स्थळी पोलीस चौक्या अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालताना सायरनचा वापर करावा, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना दिल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
ही बाब अत्यंत चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. गस्त घालताना सायरनचा वापर करावा.
निर्जन स्थळी असलेल्या पोलीस चौक्या अद्ययावत कराव्यात. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावी प्रकाशझोत आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना देणे आवश्यक आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी, अशी सूचना पुणे पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यावर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकीतून फलनिष्पत्ती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला, याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावा.
यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निर्मूलन कक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे.
काही ठिकाणी घरातील व्यक्तीकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांमध्ये शाळा, महाविद्यालय तसेच स्कूल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे.
शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक ‘बॅड टच, गुड टच’ यावर कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे, असे त्या म्हणाल्या. पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई संदर्भातील यशकथा प्रसारमाध्यमांतून वेळोवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे.
यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. पुणे शहर व परिसरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर राहण्याच्या सूचनाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिल्या.
