सहकारनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा बाळगणारा आरोपी अचानक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सतर्क पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या आदेशाने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
पुणे-सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर आल्यावर, पोलीस अंमलदार अमोल पवार आणि महेश मंडलिक यांना एक इसम घाईघाईने स्वारगेटच्या दिशेने जाताना दिसला. त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
त्याचे नाव विचारल्यावर त्याने आपले नाव निलेश हिरानंद विरकर (वय ३३, व्यवसाय : नोकरी, राहणार : विष्णु गावडे चाळ, रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर जवळ, चिंचवड स्टेशन समोर, चिंचवड, पुणे) असे सांगितले.
सदर इसम तेथून गडबडीत निघून जाण्याचे कारण विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे अधिक विचारपूस करत असताना, तो पॅंटच्या डाव्या खिशात सारखा हात घालून काहीतरी लपवत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय आल्याने, त्याचा खिसा तपासला असता ५००/- रुपयांच्या नकली नोटांचे एक बंडल सापडले.
त्याबाबत त्याला विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने कबूल केले की, त्या नोटा नकली असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्या नकली नोटा चलनात चलवण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या.
आरोपीच्या ताब्यातून ५००/- रुपयांच्या एकूण २५० नकली चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, खंडू शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, महादेव नाळे, सागर कुंभार यांनी केली.
