महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची, येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, तसेच शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी मनोगतात मोबाईलवरून वाचन केल्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती दिली आणि पुस्तकांमधून तसेच वर्तमानपत्रांमधून वाचन करण्याचे आवाहन केले.
संत साहित्य व ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञान वाढते, आरोग्य उत्तम राहते, मन प्रसन्न होते आणि आपण जीवनात यशस्वी होतो, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी प्रशालेत ‘ओळख ज्ञानेश्वरी’ सारखे संस्कारक्षम उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज वर्तमानपत्रातील एक तरी बातमी वाचण्याचा संकल्प करण्यास प्रवृत्त केले. इयत्ता ३रीतील आकांक्षा सतीश घाडगे या विद्यार्थिनीने कलाम यांच्या कार्याविषयी तर इयत्ता ४ थीतील सिद्धी भिसे आणि युवराज बाबर यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती सांगितली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण होण्यासाठी इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील बोधकथा, विनोद, चारोळ्या, शैक्षणिक लेख, क्रीडा, सामान्य ज्ञान, आरोग्य, आणि जाहिराती अशा विविध विषयांवरील कात्रणे गोळा करून ती कार्डशीटवर चिकटवली.
विद्यार्थ्यांचे वर्तुळाकार गट तयार करून सामूहिक वाचन उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निशा कांबळे, वैशाली शेळके, राहुल चव्हाण, उमेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले, तर कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा भालेराव यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.