बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासांच्या आत पकडण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सावित्री हॉटेलसमोर हा खून झाला होता. मयत इसमाने व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमुळे आरोपी राहुल दत्तात्रय खुडे, त्याचा भाऊ सचिन दत्तात्रय खुडे, एक सरदार आणि आणखी एक अज्ञात आरोपी यांनी हातात धारदार हत्यार घेऊन घटनास्थळी येऊन दहशत निर्माण करून बाळासाहेब रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
ते उपचारा दरम्यान मयत झाले. त्यामुळे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदार तपास करत होते.
तेव्हा पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना माहिती मिळाली की, खून केलेले आरोपी कात्रज घाटातून साताऱ्याच्या दिशेने निघून जाणार आहेत. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज घाटात सापळा रचून १) राहुल दत्तात्रय खुडे (वय ४० वर्षे, रा. डायस प्लॉट गुलटेकडी, पुणे), २) सचिन दत्तात्रय खुडे (वय ३४ वर्षे), ३) सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी (वय २७ वर्षे) यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, आणि अभिषेक धुमाळ यांनी पार पाडली आहे.















