महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात चैतन्याची लाट पसरली आहे. राजकारणी मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. आता तिकीटासाठी चुरस सुरू होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, तर तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबरला नेत्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. हा फक्त ३७ दिवसांचा राजकारणाचा खेळ आहे, आणि त्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी निभावतात ते सामान्य मतदार. पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत, तर पुणे शहरात ८ मतदारसंघ आहेत. मतदार राजा कोणाला निवडून देतो, हे पुढील महिन्यात २३ तारखेला कळेल. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने घेतलेला आढावा.
हडपसर (२१३) : हडपसर विधानसभा मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या ६ लाख १९ हजार ६९४ आहे. त्यापैकी पुरुष मतदार ३,२५,३८९ आणि महिला मतदार २,९४,२२८ आहेत. ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ७७ आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) आहेत. त्यांनी मागील निवडणुकीत (२०१९) भाजपचे योगेश टिळेकर यांचा केवळ २,८२० मतांनी पराभव केला होता.
पर्वती (२१२) : मिश्र लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी येथे सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीत (२०१९) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचा ३६,७६७ मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ५८ हजार ९०० आहे. त्यात पुरुष मतदार १,८२,३०७ आणि महिला मतदार १,७६,४९७ आहेत. ट्रान्सजेंडर मतदार ९६ आहेत.
खडकवासला (२११) : ग्रामीण आणि शहरी भाग असलेल्या या मतदारसंघात भाजपचा गड आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर (भाजप) सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांचा २,५९५ मतांनी निसटता पराभव केला होता. यंदा एकूण मतदारसंख्या ५ लाख ६६ हजार ५०४ आहे, ज्यात पुरुष २,९९,०८३ आणि महिला २,६७,३८० आहेत. ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ४१ आहे.
शिवाजीनगर (२०९) : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात शहरी भागाचाही समावेश आहे.यंदाच्या निवडणुकीत २ लाख ९१ हजार ०६ मतदारसंख्या आहे. त्यामध्ये पुरुष १४४६३५ ,तर महिला मतदार १४४३२५ आहेत. ट्रान्स जेन्डर मतदार आहेत ४६ . विद्यमान आमदार आहेत सिदार्थ शिरोळे (भाजप).त्यांनी मागील निवडणुकीत (२०१९)कॉंग्रेस च्या दत्ता बहिरट यांचा ५१२४ इतक्या फरकाने पराभव केला होता.
कोथरूड (२१०) : कोथरूड विधानसभा मतदार संघात शहरी भागाचाही समावेश आहे.यंदाच्या निवडणुकीत ४ लाख ३६ हजार ४७२ मतदारसंख्या आहे.त्यामध्ये पुरुष २,२७,०४७, तर महिला मतदार २,०९,४०३ आहेत. ट्रान्स जेन्डर मतदार २२ आहेत. विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत पाटील (भाजप) त्यांनी मागील निवडणुकीत (२०१९) मनसेच्या किशोर शिंदे यांचा २५,४९५ इतक्या फरकाने पराभव केला होता.
वडगाव शेरी (२०८) : वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शहरी भागाचाही समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत ४ लाख ९७ हजार ११६ मतदारसंख्या आहे. त्यामध्ये पुरुष २,५६,४२९, तर महिला मतदार २,५०,५८५. ट्रान्स जेन्डर मतदार आहेत १०२. विद्यमान आमदार आहेत सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) त्यांनी मागील निवडणुकीत (२०१९) भाजपच्या जगदीश मुळीक यांचा ४,९५६ इतक्या फरकाने पराभव केला होता.
कसबापेठ (२१५) : कसबापेठ विधानसभा मतदार संघात शहरी भागाचाही समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत २ लाख ८६ हजार ६९७ मतदारसंख्या आहे. त्यामध्ये १,३९,५२९, तर महिला मतदार १,४३,१४१. ट्रान्स जेन्डर मतदार ३७ आहेत. विद्यमान आमदार आहेत रवींद्र धंगेकर (कॉंग्रेस) त्यांनी मागील निवडणुकीत (२०१९) भाजपच्या हेमंत रासने यांचा १०,९५० इतक्या फरकाने पराभव केला होता.
पुणे कॅन्टोन्मेंट (२१४) : हडपसरला लागून असलेला हा मतदारसंघ आहे. समिश्र लोकवस्ती आहे, आणि ग्रामीण व शहरी भागाचा समावेश आहे. हा भाजपचा गड आहे. विद्यमान आमदार सुनील कांबळे (भाजप) आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांचा १४,९९५ मतांनी पराभव केला होता. यंदा एकूण मतदारसंख्या २ लाख ९३ हजार १४६ आहे. त्यापैकी पुरुष मतदार १,४८,०८४ आणि महिला मतदार १,४४,२४४ आहेत. ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ३४ आहे.
फाटाफूटीमुळे पुण्यात अटीतटीच्या लढतीं :- विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजली असून, पुणे शहरातील ८ आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३ अशा ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीची चिन्हे दिसू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी बाजी मारल्याने आता विधान सभा निवडणुकीत काय होणार ? या बाबत कमालीची संभ्रमावस्था दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, बंडखोरांनी विद्यमान आमदारांची झोप उडवली आहे. या निवडणुकीत गणिते कशी असतील, यावर चौकाचौकात चर्चा झडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आकडेमोड केल्यास आगामी निवडणूक किती रंगतदार होईल, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. राज्यात अनेक वर्षांनंतर थेट लढतींची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने बंडखोर शिरजोर ठरणार, की त्यांची हवा निघून जाणार, यावर बहुतांश मतदारसंघांतील गणिते अवलंबून आहेत.

