व्यावसायिकाला धमकावून उकळली तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील मिलेनियम नॅशनल स्कूलमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून घायवळ टोळीने तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळली होती.
याप्रकरणी नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ तसेच त्या शाळेतील क्रीडा शिक्षकासह एकूण १३ जणांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान घडला होता.
या प्रकरणात बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बापू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबुल गोळेकर आणि बबलू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला एका संस्थेच्या शाळेच्या कॅन्टीनला खाद्यपदार्थ पुरवतात. शाळेतील क्रीडा शिक्षक बापू कदम यांनी “माझी कोथरूड भागात डेअरी आहे, तुम्ही आमच्याकडून पनीर आणि दूध खरेदी करा,” असे सांगितले.
त्यांनी महिलेपाशी २२ लाख रुपये घेतले, मात्र दूध किंवा पनीर पुरवले नाही. महिलेनं विचारणा केल्यावर कदम म्हणाला, “मी नीलेश घायवळ टोळीसाठी काम करतो. घायवळचा भाऊ सचिन हा क्रीडा शिक्षक आहे.
तुम्हाला या वर्षीपण कॅन्टीनला माल पुरवायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुमचा व्यवसाय बंद पाडू,” अशी धमकी देऊन त्यांनी एकूण ४४ लाख रुपयांची खंडणी उकळली.
नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर यापूर्वीही कोथरुडमध्ये गोळीबार करून तरुणाला जखमी केल्याबद्दल दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
कोथरुडमधील मुठेश्वर मंदिराजवळ गोळीबार केल्यानंतर या टोळीने काही अंतरावर एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आता खंडणीच्या गुन्ह्यात ही टोळी तिसऱ्यांदा मोक्का कारवाईच्या विळख्यात सापडली आहे.















