पिंपळे सौदागरच्या ज्येष्ठांनी केला निर्धार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये चैतन्य हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मतदान करण्याची शपथ घेतली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, आणि चिंचवड मतदार संघांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
त्याच अंतर्गत पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये चैतन्य हास्यक्लब व ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत “करूया योगा, हो मतदार राजा जागा” हा मतदान जनजागृती अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात महापालिकेचे मुख्य लिपिक किशन केंगले, लिपिक अभिजित डोळस, विकास गायकांबळे, आणि पियुष घसिंग यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली. तसेच आपल्या परिसरात आणि सोसायटीमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्याचे आश्वासन देखील नागरिकांनी दिले.
पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगत शहरात मताचा अधिकार बजावण्याबाबत उदासीनता दिसून येणे आपल्या शहराच्या नावलौकिकाला शोभणारे नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत नेटाने मताचा अधिकार बजावण्याचा निर्धार ज्येष्ठ नागरिक संघाचे राम साळुंखे यांनी संघाच्या वतीने केला.
दरम्यान, महापालिकेच्या स्वीप कक्षामार्फत चिंचवड येथील एलप्रो मॉल येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत नागरिकांनी शपथ घेतली.
या कार्यक्रमात महापालिकेचे मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किशन केंगले, लिपिक अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, सचिन महाजन, आणि पियुष घसिंग यांच्यासह युवा, नवमतदार आणि नागरिक उपस्थित होते.