चोरट्यांना बाकरवडीची भुरळ, दीड लाखाची रोकड लंपास
पुणे : दिवाळी सणाच्या तोंडावर देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधूंच्या बाकरवडीची चोरट्यांना भुरळ पडली आहे.चोरट्यांनी बाणेर येथील दुकानातून बाकरवडीसह १ लाख ४१ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बाणेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या बाणेर शाखेत रविवारी पहाटे ४:०० च्या सुमारास दोन चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली.
ही रक्कम १ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे.
चोरीच्या या कटात कोणता कामगार सहभागी आहे का? याची शंका वर्तवली जात आहे. बाणेर पोलीस स्टेशनमध्ये या चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे. चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि चोरी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तपासाला सुरुवात केली आहे.