‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून जपली सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतर्फे ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संस्था आणि अनाथाश्रमांना किराणा मालाची मदत करण्यात आली.
गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रशालेतील ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’च्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम, नैसर्गिक आपत्तीग्रस्त ठिकाणी (पूरग्रस्त, कोरोना महामारी इ.) मदत केली जाते.
तीच मदतीची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवत, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, आळंदी यांच्या वतीने स्नेहवन अनाथाश्रम, कोयाळी, खेड आणि नैसर्गिक शिक्षा संशोधन व प्रशिक्षण संस्था, देवली (मळवली), मावळ यांना तब्बल ८० हजार रुपयांच्या किराणा मालाची मदत करण्यात आली. तसेच प्रशालेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या चार मावशींना दीपावलीनिमित्त साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमात संस्था, सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी आर्थिक मदत करून जमा झालेल्या रकमेतून दोन्ही अनाथाश्रमांना प्रत्येकी ४० हजार रुपये किमतीचा किराणा माल सुपूर्त करण्यात आला.
याप्रसंगी स्नेहवन अनाथाश्रमाचे बाबाराव देशमाने, नैसर्गिक शिक्षा संशोधन अनाथाश्रमाचे अल्हाद टपाले आणि त्यांचे सहकारी, तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, संस्थेचे सदस्य योगेंद्र कु-हाडे, शहाजी कर्पे, आनंदराव मुंगसे, जगदीश भोळे, अनिल वडगावकर, सदाशिव येळवंडे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने प्रज्ञा यादव, सूर्यकांत खुडे आणि रामदास वहिले यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी अल्हाद टपाले यांनी मनोगतात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याची जाणीव निर्माण केली जाते, ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.
स्नेहवन अनाथाश्रमाच्या वतीने माणिक काळे यांनी अनाथाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर मदतीमुळे येणारा आनंद सर्वांना समाधान देणारा असल्याचे सांगितले. अजित वडगावकर यांनी संत ज्ञानेश्वरांच्या “दुरितांचे तिमिर जावो” आणि संत तुकारामांच्या “जे का रंजले गांजले त्यासी मना जो आपुले” या उक्तीनुसार संस्था संतविचारांचे अनुकरण करून काम करत असल्याचे सांगितले.
संस्थेत चालणाऱ्या सामाजिक उपक्रमांच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा मोठा आहे आणि यापुढेही या कार्याला असेच जिवंत ठेवू, असे आश्वासन दिले. शेवटी डॉ. दीपक पाटील व आनंद मुंगसे यांनी संस्थेत चालणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून, या उद्दात भावनेने संस्थेची भरभराट होवो, अशी शुभेच्छा दिल्या.
दीपक मुंगसे यांनी सणाच्या महत्त्वाची माहिती देत सण साजरा करताना मिळून-मिसळून आनंद साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक अनिता पडळकर यांनी ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रदीप काळे यांनी केले.