बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शीतील एका व्यावसायिकाची साडेतीन लाखाची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांतीलाल शिवलाल मूनोत यांचे तुळजापूर रोड व दाणे गल्ली येथे दोन ऍग्रो एजन्सी चे दुकान आहे. दि. २८ ऑक्टोबर रोजी दिवसभरातील विक्री केलेली रोख रक्कम ३,६०,००० रू. असलेली पांढरी बॅग त्यांच्या दुकानातील कामगार मार्फतीने पांढऱ्या कापडी पिशवीमध्ये स्कुटी वरून दाणे गल्लीच्या दुकानात आणली होती.
त्यानंतर दुकानातील सर्व कामगार यांनी, फिर्यादीसह सर्वांनी मिळून दुकानातील साफसफाई केली. त्यानंतर दुकान बंद करायचे म्हणून फिर्यादीने रोख ३,६०,००० रू असलेली पैशाची कापडी पिशवी रात्री दहा वाजेच्या सुमारास दाणे गल्ली येथील दुकानासमोर असलेल्या त्यांच्या स्कुटीच्या हुकाला आडकवली आणि कामगारांना दुकानात कुलूप लावण्यास सांगण्याकरता दुकानात गेले आणि त्यानंतर साधारण दहा मिनिटांनी ते स्कुटीपाशी परत आले असता स्कुटीला अडकवलेली पांढरी रोख पैशाची पिशवी त्यांना दिसून आली नाही.
त्यानंतर त्यांनी आजूबाजूला पाहिले परंतु ती पिशवी त्यांना मिळून आली नाही. त्यांनी कामगारांना विचारले पण त्यांना त्या पिशवी बाबत काही एक माहिती नसल्याचे सांगितले तेव्हा त्यांची खात्री झाली की त्यांची पांढरी कापडी पिशवी मधील रोख रक्कम हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
त्यावरून त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची फिर्याद दिली. तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे करत आहेत.
