पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर ग्रामीण : सोलापूर जिल्ह्यात सण-उत्सवांमध्ये आता पारंपरिक वाद्यांचा नाद घुमणार आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या ‘नो डीजे, नो डॉल्बी’ मोहिमेला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांमध्ये या उपक्रमाचे व्यापक कौतुक होत आहे. या निर्णयामुळे यंदाचा शिवजयंती उत्सव तसेच आगामी यात्रा-उत्सव पारंपरिक आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून लग्नसोहळे, मिरवणुका, वाढदिवस आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे व डॉल्बी सिस्टीमचा वापर वाढला होता. कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता. अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
ध्वनी प्रदूषणामुळे सामाजिक शांततेलाही बाधा येत होती. ही बाब लक्षात घेऊन शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात ‘नो डीजे, नो डॉल्बी’चा नारा दिला.
या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी यंदा डीजेला फाटा दिला आहे. सध्या सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसत आहे.
मंडळांनी डीजे ऐवजी लेझीम, सनई-चौघडा, ढोल-ताशे, हलगी अशा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. तसेच ऐतिहासिक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देत उत्सव अधिक मंगलमय व वैचारिक बनविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांनी केवळ आदेश जारी न करता ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. डीजेच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
तरीही नियमांचे उल्लंघन करून डीजे किंवा डॉल्बीचा वापर केल्यास संबंधित यंत्रणा जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे सण-उत्सव आता खऱ्या अर्थाने आनंददायी व आरोग्यदायी वातावरणात साजरे होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
















