कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल : वारजे पोलिसांनी पत्नीवर केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पत्नीशी होत असलेल्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका सलुन मालकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वारजे माळवाडी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर (वय ६८, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५, रा. शोभा हाइट्स सोसायटी, दांगट इस्टेट, शिवणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवणे येथील दांगट इस्टेटमधील शोभा हाइट्स सोसायटीत २ फेब्रुवारी रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचे शोभा हाइट्स येथे सलून होते. सुमारे १३ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. मात्र दोघा पती-पत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. कौटुंबिक वादातून गेल्या वर्षी प्रतिभा क्षीरसागर या माहेरी निघून गेल्या होत्या.
त्यानंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी आणले होते. मात्र त्यानंतरही त्यांच्यातील वाद थांबले नव्हते. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे पुढील तपास करीत आहेत.
















