गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई : ८ लाखाची अवैध दारू जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सहकारनगर भागात अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडून ८,३३,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि अंमलदारांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.
हे पथक अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून असताना, पोलीस अंमलदार विजय पवार, विनोद चव्हाण, आणि ओमकार कुंभार यांना माहिती मिळाली की सहकारनगर भागात टेम्पोमधून मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची अवैध वाहतूक होत आहे. त्यांनी ही माहिती युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली, आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने, युनिट २ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांच्या पथकाने रविवारी (दि.३ नोव्हेंबर २०२४) सायंकाळी सीएनजी गॅस पाईपलाईनजवळ केके मार्केट, बालाजीनगर, पुणे येथे छापा टाकला.
पोलिसांनी टेम्पो चालक सुरेश लक्ष्मीनारायण प्रजापती (वय २५ वर्षे, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याला टेम्पोसह ताब्यात घेतले. त्या टेम्पोमधून एकूण २४ कॅन हातभट्टी दारू (८४० लिटर) सह ८,३३,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामगिरीत युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार विजय पवार, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार, संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, आणि राहुल शिंदे यांनी केली आहे.
