महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. ४) पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज छाननीनंतर एकूण ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १७९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर होती, तर ३० ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर २०२४) अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती.
चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार असून, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात २०, तर हडपसर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. भोर आणि मावळ मतदारसंघात सर्वात कमी प्रत्येकी ६ उमेदवार आहेत.
पुणे शहरातील कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, आणि खडकवासला येथे बंडखोरी रोखण्यात; तसेच वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत टाळण्यात महायुती यशस्वी झाली आहे. तर कसबा, पर्वती, आणि शिवाजी नगर मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे.
सात मतदारसंघांत दोन बॅलेट मशीन –
उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघात दोन बॅलेट मशीन असणार आहेत. उर्वरित १४ मतदारसंघांत एकच बॅलेट मशीन वापरण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सोमवारी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा दिवस सोमवारी संपल्यानंतर डॉ. दिवसे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. डॉ. दिवसे म्हणाले, “एका बॅलेट मशीनवर १६ बटणे असतात. त्यापैकी १५ बटणे उमेदवारांसाठी आणि एक बटण नोटासाठी (NOTA) असते. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतील मतदारांची आकडेवारी अंतिम झाली आहे. त्यानुसार ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार आहेत. इंदापूर, बारामती, चिंचवड, वडगाव शेरी, पुणे कँटोन्मेंट आणि हडपसर मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १६ पेक्षा अधिक उमेदवार असल्याने, नोटासाठी स्वतंत्र बॅलेट मशीन ठेवावे लागणार आहे.”
बारामतीकडे देशाचे लक्ष्य –
बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार लढत देत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. ही खरी लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच असल्याचे बोलले जात आहे. जाहीर सभा, प्रचारफेऱ्या, वैयक्तिक गाठीभेटी यांचा धुरळा या मतदारसंघात प्रचाराच्या १४ दिवसांत उडणार आहे.
