एकाला अटक : खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खडकी पोलिसांनी एका रिक्षातून विक्रीसाठी नेला जात असलेला २,८१,२२० रुपये किमतीचा गांजा पकडला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून रिक्षाही जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी खडकी पोलीस स्टेशनमधील पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. पुणे-मुंबई जुना हायवेवरील कामगार आयुक्तालयासमोर थांबलेल्या रिक्षाजवळून जात असताना त्यांना गांजाचा वास आला. त्यामुळे त्यांनी रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा मिळाला.
रिक्षात बसलेल्या अफजल सनाउल्ला सय्यद (वय ३९ वर्षे, रा. सर्वे नं. २३०, सनराईज बेकरीच्या पाठीमागे, पुणे; मूळ गाव गु.पो. दिघीहाटी, ता. वेल्हा, जि. पुणे) याच्या ताब्यातून २,८१,२२० रुपये किमतीचा ५ किलो ६३० ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ, जप्त करण्यात आला. पोलिसांनी रिक्षा जप्त करून खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खडकी पोलीस स्टेशनने २ नोव्हेंबर रोजी एस.टी. बसमधून गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून २ आरोपींकडून १,५९,१५० रुपये किमतीचा दहा किलो गांजा जप्त केला होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशनचे सतिश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, पोलीस अंमलदार आशिष पवार, संदेश निकाळजे, शिवराज खेड, बीट मार्शल अंमलदार सुधाकर राठोड, सुधाकर तागड यांनी केली आहे.
