फुरसुंगीच्या लॉज मालकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लॉजच्या टेरेसवर विना परवाना शिवसेना उमेदवाराच्या नावाचा एअर बलुन लावून आचार संहिता भंग केल्याबद्दल फुरसुंगीच्या लॉज मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शेखर अमददीप कांबळे (वय ३८, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंगचे मालक अक्षय अरुण पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंडळ कृषी अधिकारी असून सासवड येथे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची भरारी पथकाचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. कर्तव्यावर असताना दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांना कळवण्यात आले की फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंगच्या टेरेसवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह असलेला एअर बलून बांधलेला आहे.
त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मोरे व व्हिडिओग्राफर एस. ए. आडाळगे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टेरेसवर एअर बलून बांधलेला आढळला. लॉजचे मालक अक्षय अरुण पवार हे बाहेर गेले असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.
एअर बलूनसाठी परवानगी घेतली आहे का, याची चौकशी केली असता अर्ज केला आहे, परंतु परवानगी अद्याप मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी आचारसंहिता कक्षाशी चौकशी केली असता, बलूनसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करीत आहेत.
