महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 4,40,555 मतदार असून, येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, कोथरूड मतदारसंघातील 387 केंद्रांवरच्या सुमारे 4.40 लाख मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राबाबत तपशीलवार माहिती देणाऱ्या वोटर स्लिप्सचे वाटप बीएलओंच्या मार्फत घरोघरी सुरू आहे.
कोथरूड मतदारसंघाचा बहुसंख्य भाग शहरी असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना वोटर स्लिप वाटणे थोडेसे आव्हानात्मक आहे. तरीसुद्धा, या मतदारसंघातील सुमारे 387 बीएलओंनी हे काम नुकतेच सुरू केले आहे.
हे काम संध्याकाळी देखील सुरू असून, सुमारे दहा टक्के मतदारांना वोटर स्लिप्सचे वाटप पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी दिली. मतदारांना वोटर स्लिप्सचे वाटप करताना, बदललेल्या केंद्राबाबत देखील घरोघरी जाऊन माहिती दिली जात आहे.
तसेच, ज्येष्ठ नागरिकांनाही या वोटर स्लिप्सबाबत माहिती दिली जात आहे. वोटर स्लिप्समुळे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राबाबत मतदानापूर्वीच माहिती मिळत असल्याने, मतदानाच्या दिवशी त्यांना अडचण येणार नाही. त्यामुळे, त्यांना त्यांच्या मतदानाचा अधिकार सुरळीतपणे पार पाडता येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी या कामाची पाहणी केली असून, काही ठिकाणी स्वतः भेट देऊन नवीन मतदार तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.
“वोटर स्लिप्सच्या वाटपामुळे मतदान करणे सोपे होईल,” अशी प्रतिक्रिया एरंडवणे विभागातील ज्येष्ठ नागरिक प्रफुल्ल पेंढारकर यांनी दिली. तसेच, या निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनी सुट्टी न घेता जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी 17 मोठ्या हाउसिंग सोसायट्यांमध्ये स्वतंत्रपणे मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, त्याबाबत संबंधित सोसायटीचे चेअरमन व सचिवांशी संवाद साधला जात आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वोटर स्लिप्सचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी दिली.