जावयाला मारहाण करून पत्नी, मुलास गेले घेऊन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पतीपत्नीच्या भांडणात इतरांनी नाक खुपसु नये, असे म्हणतात. मुलीच्या संसारात तिचे माहेरचे जरुरीपेक्षा अधिक लक्ष घालू लागले की भांडणे ही होणारच, असे म्हटले जाते़ त्याचा प्रत्यय धनकवडीतील संभाजीनगरमध्ये आला़ पतीपत्नीच्या भांडणात माहेरकडील मंडळीने मुलीच्या सासरी येऊन जावयाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी दत्तात्रय विजय भडकवाड (वय ३१, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित विजय पारधे (वय २९), रोशनी दत्तात्रय भडकवाड (वय २१), रेश्मा विजय पारधे (वय ५०) आणि बाळु दासु पारधे (वय ४०, सर्व रा. वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार धनकवडीतील संभाजीनगर येथे फियार्दीच्या घरी सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी रोशनी हिने घरगुती कारणावरुन फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर तिने आई, चुलता व भावास बोलावून घेतले. ते जावयाच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन हातानी मारहाण केली.
फियार्दीचा मेव्हणा रोहित पारधे याने त्यांच्या घरात असलेला लाकडी दांडका घेऊन फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर मारुन त्याला जखमी केले. फिर्यादीची पत्नी व मुलाला घेऊन गेले. हा तपास पोलीस हवालदार मानसिंग जाधव करीत आहेत.
