चांदणी लॉन्स येथे घेतली विनापरवाना सभा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मंगल कार्यालयात विनापरवाना स्टेज उभारून सभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार सचिन दोडके यांच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
रोहन ज्ञानोबा धावडे, संजय (बाबू) दोडके, आणि अजयभाऊ पोळ (सर्व रा. वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक प्रमुख राहुल सर्जेराव साळुंखे यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास चांदणी चौकातील चांदणी लॉन्स येथे घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सचिन शिवाजीराव दोडके हे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. रोहन धावडे यांनी चांदणी चौकातील चांदणी लॉन्स येथे विनापरवाना स्टेज, साऊंड, खुर्च्या, बॅनर आणि स्नेहभोजन कार्यक्रमाची व्यवस्था करून लोकांची गर्दी जमवून सभा घेतली.
या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी संजय दोडके यांनी व्हॉट्सअपद्वारे जाहिरात करून नागरिकांना बोलावले. तसेच, “वारजेकरांचा निर्धार – सचिनभाऊ दोडकेच आमदार” या आशयाचा बॅनर कार्यक्रमस्थळी अजयभाऊ पोळ यांनी शुभेच्छुक म्हणून लावला.
तिघांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडी करत आहेत.
