तरुणाला दोघांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारु पित असलेल्याला कधी सल्ला देऊ नये. त्यात त्याच्या नाकर्तेपणाबाबत तुम्ही काही म्हटले तर तुमची काही खैर नाही. असाच प्रकार समोर आला आहे. ‘अच्छा खाना नही दे सकते हो, तो शादी क्यु बनाया,’ असे म्हटल्याने दारुच्या नशेत दोघांनी तरुणाच्या तोंडातून रक्त येईपर्यंत हाताने मारहाण केली. बुटाने तोंडावर लाथा मारुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
त्यात बोधु शेख (वय ३७) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत देवलाल राजमुनी सिंग (वय २२, रा. बोराटेनगर लेबर कॅम्प, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद परमेश्वर भुईयां (वय २९) आणि मुकेशकुमार राजेश्वर मेहता (वय २६, दोघे रा. बोराटेनगर लेबर कॅम्प, खराडी) यांना अटक केली आहे. ही घटना बोराटेनगर लेबर कॅम्पमध्ये १० नोव्हेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे बांधकाम कामगार आहे. लेबर कॅम्पमधील घरात ते रहातात. फिर्यादी हे जेवण करुन त्यांच्या रुममध्ये मोबाईल पहात होते. त्यांच्या शेजारच्या खोलीत आरोपी प्रमोद, मुकेशकुमार आणि बोधु शेख हे दारु पित बसले होते.
यावेळी बोधु शेख हा प्रमोद भुईयां याला म्हणाला की, तुम तुम्हारे बीवी और बच्चो को अच्छा खाना नही खिला पिला सकता तो शादी क्यु बनाया, असे म्हणाला. त्याचा राग आल्याने त्यांनी हाताने बोधु शेख याच्या तोंडावर रक्त येईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी बोधु शेख याला रुमच्या बाहेर ओढत आणले.
रुमच्या समोर असलेल्या जागेत नेऊन त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मुकेशकुमार याने पायातील चामड्याच्या बुटाने तोंडावर जोरात लाथा मारल्या. प्रमोद भुईयां याने हाताने व बुक्क्यांनी त्याच्या डोक्यात, डोळ्याला, कानाला व हनुवटीस दुखापत केली.
पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करीत आहेत.