महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने महर्षि आनंद सेवा पुरस्कार वितरण संपन्न
महाराष्ट्र जैन वार्ता
आळंदी : प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांना दीक्षा दिनानिमित्त आळंदी संघाच्या वतीने आदर की चादर प्रदान करण्यात आली. यावेळी महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने, जैन श्रावक संघाच्या सहयोगाने, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी महर्षि आनंद सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाही हा पुरस्कार वितरण समारंभ आळंदी येथील आनंद मंगल सभागृहात प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. आणि मधुर व्याख्यानी प. पू. विजयस्मिताजी म. सा. त्यांच्या मंगलमय सानिध्यात पार पडला.
दापोडी येथील श्री संघाचे सचीव आणि पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उपाध्यक्ष दिलीप भन्साळी यांना धार्मिक क्षेत्रातील संत आणि समाजसेवा करणाऱ्या त्यांच्या कार्याबद्दल “महर्षि आनंद संत समाजसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
पुण्यातील अरिहंत जागृती मंचचे कार्याध्यक्ष आणि जैन सोशल ग्रुप पुणे आनंदचे संस्थापक विजय पारख यांना जैन धर्माची अस्मिता आणि जागृती क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल “महर्षि आनंद जिन धर्म सेवा पुरस्कार” देण्यात आला. औंध येथील रवींद्र बलाई यांना “महर्षि आनंद विहार सेवा पुरस्कार” संत सेवा आणि विहार सेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांनाही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात येते. यंदा “नवचैतन्य सामाजिक संस्था, चिखली” यांना गेल्या तीन वर्षांत समाज प्रबोधन, परिवार कल्याणाचे उपक्रम आणि अन्नदानाचे कार्यक्रम राबवल्याबद्दल “महर्षि आनंद समाज प्रबोधन सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या संस्थेच्या वतीने अध्यक्षा अनिता नहार आणि त्यांच्या पदाधिकारी सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हे सर्व पुरस्कार महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, आळंदीचे अध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी चंद्रशेखर लुंकड, प्रणित बागमार, विलासकुमार पगारिया, अमित नहार, अविनाश बोरुंदिया, मनोज लुंकड, संदीप चोरडिया, वसंतलाल बोरा यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला.
महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या नऊ वर्षांत २० पेक्षा जास्त नेत्रचिकित्सा शिबिरे आणि मोफत चष्मे वाटप शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये सुमारे 3000 पेक्षा जास्त नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि 2500 पेक्षा जास्त लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. काहींच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या प्रेरणेने प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे.