साडेसात लाखांचे साहित्य, बनावट बँक खाते, सिम कार्ड आणि आधार कार्ड जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ‘रेड्डी आन्ना’ नावाच्या बंदी घातलेल्या बेटिंग वेबपोर्टलद्वारे विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळवताना पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ४८ हजार १०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार संदेश शिवराम जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पियुष शेषनारायण सोनी (वय १९), मुनेश्वर चुरानंद देवागन (वय १९), अजय अरुणकुमार सिन्हा (वय २४), संजय माणिक परदेशी (वय १९), हितेश पुनाराम देवांग (वय २७), सागर अशोक गजभीर (वय २७), अनिकेत हेमंत यादव (वय १९), अक्षय अमीन अस्थाना (वय २७), फुलेंद्र अशोकराय कुमार (वय २७, सर्व रा. अॅडम व्हिले सोसायटी, गायकवाडनगर, पुनावळे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आकाश दास ऊर्फ जॅक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील गायकवाडनगरमधील अॅडम व्हिले सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये ऑनलाइन जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, रविवारी रात्री पावणे दहा वाजता पोलिसांनी छापा टाकला.
आरोपी ‘रेड्डी आन्ना’ नावाच्या प्रतिबंधित वेबपोर्टलद्वारे स्वतःच्या तसेच इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी कट रचून ऑनलाइन जुगार खेळवत होते. या जुगारासाठी बनावट बँक खाते, सिमकार्ड वापरून, संगणक आणि मोबाईलद्वारे पासवर्ड मिळवून, बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून, सामान्य लोकांची फसवणूक करत होते.
पोलिसांनी त्यांच्या कडून ७ लाख ४८ हजार १०० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.