पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानातील सेल्समनची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बंटी आणि बबलीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या विरोधात पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे येथील एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक केलेल्यांची नावे शेखर हेमराज वानी (वय ३२, रा. शिवाजी पुतळा, मांजरी, हडपसर) आणि शिवानी दिलीप साळुंखे (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी आहेत.
कॅम्प परिसरातील एका दागिन्यांच्या दुकानात एक महिला आणि पुरुष आले. त्यांना कानातील टॉप्स घ्यायचे होते. दुकानातील सेल्समन त्यांना ट्रेमधून कानातील टॉप्स दाखवत होते. यावेळी, त्या दोघांनी हातचलाखी करून सेल्समनची नजर चुकवली आणि २ टॉप्स स्वतःच्या हातात ठेवले.
तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीनेही एक टॉप्स हातात घेतला आणि मोबाईल खिशात ठेवण्याचा बहाणा करून तो टॉप्स खिशात ठेवला. दोघेही काहीही खरेदी न करता निघून गेले. त्यानंतर सेल्समनने ट्रेमधील टॉप्स तपासून पाहिले असता ३ टॉप्स गायब असल्याचे आढळले.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर, दोघांनी ९५ हजार रुपयांचे ३ टॉप्स चोरल्याचे स्पष्ट झाले. बाहेरील सीसीटीव्ही पाहिल्यावर ते दुचाकीवरून आलेले दिसले. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर त्या महिलेला केशवनगर येथे राहात असल्याचे समजले.
त्यानुसार त्यांच्या घरी छापा टाकल्यावर दोघेही तेथे मिळून आले. त्यांनी चोरीची कबुली दिली. अधिक तपासात त्यांनी पुणे शहरात २, मुंबई शहरात १, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १, सातारा जिल्ह्यात १, पिंपरी-चिंचवड शहरात २, आणि ठाणे शहरात १ असे एकूण ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एक गुन्हाही उघडकीस आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी केली आहे.